चूक? कुणाची?

चूक? कुणाची?

चूक? कुणाची?

त्या दिवशी राघवच्या दवाखान्यात जे काही घडलं त्यात नक्की चूकच होती का आणि असली तर कुणाची होती हे ठरवणे कठीण आहे. त्यासाठी त्या प्रसंगाची पूर्ण तपासणी करणेच गरजेचे आहे.

राघव हा माझा अगदी शाळेपासूनचा मित्र. अभ्यासात हुशार आणि त्याहून विशेष म्हणजे व्यवहार चतुर. खोडकर तसाच मनमिळावू. वर्गात इतरांच्या खोड्या काढणे, व्रात्यपणा करणे पण तोही अशा चलाखीने की त्यात कुणी दुसराच आमच्यासारखा गबाळा पकडला जावा आणि हे करताना त्याचा खेळकरपणासुद्धा इतका पारदर्शक की त्याची शिकार झालेल्या आमच्यासारख्या सावजालासुद्धा त्याचा राग येऊ नये. तर असा हा राघव. एम्.बी.बी.एस. झाल्याबरोबर शहराबाहेर मोक्याच्या जागी त्याने दवाखाना थाटला आणि उपजत व्यवहार चातुर्याने व्यवसायात त्याने अगदी थोड्या काळात यशही मिळवून दाखविले. त्याच्या दवाखान्यात किरकोळ आजारांसाठी ओ.पी.डी. होती ते त्याचे मुख्य काम आणि तो त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आणि या ओ.पी.डी. बरोबरच बाजूच्या छोट्या दोन खोल्यांमध्ये त्याने एक छोटेखानी हॉस्पिटल टाकले होते. या हॉस्पिटलमध्ये तो पेशंटना सलाईन लावत असे, आजार जर थोडा जास्त असेल तर तिथेच एका खाटेवर दिवसभर ठेवून घेत असे. फक्त दिवसा चालणारे हे त्याचे छोटेखानी हॉस्पिटल होते.

एम्.डी. झाल्यावर मी जेव्हा माझा व्यवसाय सुरु केला तेव्हा आमचा हा राघव एकदम भरात होता. तुडुंब भरलेली ओ.पी.डी. आणि पेशंटच्या गराड्यात सापडलेला राघव. बाजूच्या हॉस्पिटलमधे सलाईन चढवून घेणारे गरजू पेशंट. हे दृश्य आमच्यासारख्या ‘नवजात’ डॉक्टरांच्या मनात असूया निर्माण करीत असे. आपल्या दवाखान्याबाहेर आपली वाट पाहणारे पेशंट असावेत आणि त्यांच्या गर्दीतून वाट काढत आपण दवाखान्यात प्रवेश करावा अशी स्वप्ने पाहण्याचा एक काळ असतो. (बहुसंख्य डॉक्टर मंडळींना याहून मोठी स्वप्ने पडत नाहीत, हा एक प्रकारचा ‘स्वप्नदोष’ म्हणावा काय?) मी तेव्हा त्याच काळात होतो. कायम असे वाटायचे,काय मजा आहे राव या पठ्ठ्याची! रोज ही अशी गर्दी आणि जमणारा रोजचा गल्ला याहून मोठे सुख ते कोणते? वगैरे. एक अशी आशाही असे की याच गर्दीतून राघव काही पेशंट माझ्याकडे पाठवू शकेल. आणि असाच हळू हळू आपलाही जम बसेल. आणि घडलेही थोडेसे तसेच.

एक दिवस सकाळी-सकाळी राघवचा मला फोन आला-

‘अरे मी राघव बोलतोय. उद्या एका पेशंटला बोलावलंय. सगळ्या तपासण्या झाल्यात. माझ्याकडच्या एक्स-रे मशीनवर मी एक्स-रेही घेऊन ठेवला आहे. त्याला डावीकडे pleural effusion आहे. ते काढायला लागेल. मी त्यांच्याशी सगळं बोललेलो आहेच. तर उद्या तुला वेळ आहे का हॉस्पिटलला यायला? मी सगळी तयारी करून ठेवतो. पेशंट खूप गरीब आहे. मोठ्या हॉस्पिटलचा खर्च त्याला झेपणार नाही. म्हणून आपल्याकडेच करू म्हणतो. जमेल का तुला?’

हे ऐकले आणि सुखावलोच मी. तेव्हा मी ससूनमधून शिकून नुकताच बाहेर पडलो होतो. असे विशेष आजाराचे पेशंट थोडेच बघायला मिळत. ह्या पेशंटच्या छातीत डावीकडे पाणी झाले होते आणि ते सुई घालून काढायचे होते. मी लगेचच तयारी दाखवली.

राघवचा दवाखाना गावाबाहेर लांब होता. तेव्हा माझ्याकडे स्कूटर होती. मजल-दर मजल करीत त्याच्या दवाखान्यात पोचलो. भर दुपारच्या कडक उन्हातला प्रवास. तिथे पोहोचेपर्यंत पुरता घामेजून गेलेलो. दुपार कलायला लागलेली. सकाळच्या पेशंटची कामे संपवून राघव माझीच वाट पाहात बसला होता. पेशंटही वाट बघत तयार. ‘मोठे’ डॉक्टर येणार होते ना! अशा मोठेपणाचाही एक कैफ असतो. पैसे भले न का मिळेनात, मोठेपणाच्या या धुंदीवरसुद्धा डॉक्टर काम करू शकतो.

मी खुर्चीत बसलो. समोर पाहिलं. अगदीच गरीब, खंगलेला असा पेशंट, अंगात फारसे कपडेच नाहीत, जे आहेत तेही फाटलेले. चेहऱ्यावर एक अजीजी. समोरच्या खाटेवर बसून तो माझ्याकडेच पाहात होता. किंचित दम लागला होता त्याला. मी त्याला तपासले. त्याचा एक्स रे पाहिला आणि माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याच्या पाठीत बहुधा पाणी नव्हतेच. जो होता तो जुनाट फुप्फुसाचा आजार असावा. पाठीत सुई घालून काढावे असे पाणी काही नव्हतेच मुळी. ही म्हणजे पंचाईतच झाली. पाणी नाही असे सरळ सांगावे तर राघवला काय वाटेल? त्याचे निदान चुकले असे व्हायचे. पेशंट असा गरजू, एवढी आशा घेऊन श्रद्धेने आलेला. त्याला असे परत पाठवावे तर राघवची बदनामी. आणि ते सगळे टाळण्यासाठी त्याच्या पाठीत सुई टाकावी तर त्यामुळे फुप्फुसाला इजा होण्याची थोडी भीती. आणि अशी इजा झालीच तर त्यावर उपचार करणे या असल्या हॉस्पिटलमध्ये शक्यच नाही. मी गांगरलो. उठलो. पलीकडच्या खोलीत गेलो. राघवला बाजूला घेतले. एकूण प्रकार त्याच्या कानावर घातला. म्हणालो, ‘ खरं सांगू, हा पेशंट घेऊन मी मोठ्या हॉस्पिटलमध्ये जातो. मला भीती वाटते इथे काही करता भलतंच होऊन बसायचं.’

‘काय नाय रे. च्यायला, तू उगीचच घाबरतोस. सगळी तयारी झालीय. आता उगीच भलती लफडी काढू नकोस. टाक सुई. काही होत नाही, मी सांगतो ना तुला!’ राघव म्हणाला. ‘अरे यार, ह्या छोट्या गोष्टी आहेत. फालतू गोष्टी. अशानं घाबरलास तर कसं व्हायचं? पेशंट पळेल रे असं वागलास तर.’

राघव त्याच्या व्यावसायिक यशाचे मर्मच जणू माझ्यासमोर उघडून सांगत होता. मी मात्र पुरता बधीर.

‘राघव, मी सांगतो. माझं ऐक. याला नेतो मी दुसरीकडं मोठ्या हॉस्पिटलात, पाहिजे तर ससूनमध्ये. फुकट तपासतो. पण इथं नको. कायतरी भलतंच व्हायचं.’ मी पुन्हा एकदा सांगून पाहिले.

पण राघव स्थितप्रज्ञ कठोर होता. याबाबतीत माझ्यापेक्षा अनुभवी होता. आणि मुख्य म्हणजे दवाखाना त्याचा होता. पेशंट त्याचा होता. तिथे माझं कुणीच नव्हतं. माझं म्हणून जे होतं ते होतं पुस्तकी ज्ञान. आणि त्याला जोड होती नवख्या बुळेपणाची. राघवसमोर माझा काय पाड लागणार. मी हरलो.

एखादं शस्त्र परजावं तशी मी सुई परजली, पेशंटच्या पाठीत खुपसली. माझी अपेक्षा होती तसंच झालं. छातीत पाणी नव्हतंच. सुई बाहेर काढली. त्याच्या जखमेवर कापूस लावला. पेशंट माझ्याकडे आशेनं पाहात होता.

‘झालं व्हय इतक्यात? निघलं का पाणी?’ त्यानं विचारलं.

‘नाही हो. छातीत पाणी नाहीये तुमच्या. आजार वेगळाच आहे. मी सांगतो काय करू या ते.’ मी म्हणालो आणि बाहेरच्या खोलीत गेलो. मागोमाग राघव आलाच.

‘च्यायला, घातलास ना पुन्हा घोळ. अरे थोडं पाणी निघालं असं सांगायचं. दाखवलं असतं ना आपण पाणी इकडचं तिकडचं. हे असलं भलतंच काय तरी बोलायचं म्हणजे राडाच व्हायचा ना एखाद दिवशी.’ राघव वैतागलेला दिसला मला. भारीच नाराज झाला तो माझ्यावर.

एव्हाना मलाही भान येऊ लागलं होतं. एका अनामिक भीतीचा पगडा माझ्या मनावर बसू लागला होता. न जाणो. माझ्या सुईनं त्याच्या फुप्फुसाला भोक पडलं असेल तर? या शंकेनं माझा जणू थरकाप झाला. राघव पुढंही काही तरी बोलत होता, पण आता ते मला ऐकू येईनासं झालं.

खरं तर, जे झालं होतं ते काही इतकं धोकादायक नव्हतं. एखाद्या सुईनं असं काही आभाळ कोसळेल असं घडणार नव्हतं. आणि खरं तर हे मलाही माहीत होतं. पण भीती ही एक और चीज आहे. भल्याभल्यांना लोळवते ती. आणि मला छळत होती ती बहुधा नुसती भीती नव्हती, दबावाखाली माझ्या मनाविरुद्ध मला जे वागावं लागलं त्याचा तो निषेधही असावा कदाचित. पण या सगळ्या संमिश्र भावनांमधून एक प्रकारची धिटाई माझ्यात आली.

मी ताठ उभा राहिलो. राघवच्या नजरेला प्रथमच नजर देऊन उभा राहिलो.

‘राघव, मला काळजी वाटते. आपण त्याच्या पाठीत सुई खुपसली आहे. उद्या त्यातून भलतंच काही होऊ नये. तुलाही त्रास, मलाही त्रास.’

राघवच्या चेहऱ्यावर एक तुच्छतादर्शक भाव आला. तो काही बोलू पाहात होता, पण त्याला जराही अवसर न देता मी म्हणालो, ‘मला वाटतं, मी ह्या पेशंटला माझ्याबरोबर माझ्या स्कूटरवरून ससूनला नेतो. तिथे त्याचं स्क्रीनिंग करतो. माझी खात्री करूनच मी त्याला परत पाठवतो.’

काही न बोलता मी उठलो. माझ्या स्कूटरवर पेशंटला घेतलं आणि निघालो. पेशंट तर असा गरीब की काही न बोलता माझ्या मागे स्कूटरवर बसला, तसाच, किंचित दमलेला. काही खास चौकशी करण्याचंही भान त्याला नव्हतं.

मी स्कूटर घेऊन निघणार होतो तेव्हाच मला दिसलं, राघवनंही त्याची स्कूटर माझ्या मागोमाग बाहेर काढली होती. त्याच्या चेहऱ्यावरचा तुच्छ भाव पळाला होता, त्याची जागा चिंतेनं घेतली होती. मला पुन्हा एकदा माझ्या जुन्या राघवची आठवण आली. तोच खोडकरपणा पण त्यामागे लपलेला तोच पारदर्शक प्रांजळपणा. जुना राघव अजून तसाच होता तर !

मधे काही न बोलता स्कूटर चालवत आम्ही ससूनला पोहोचलो. पेशंट गुमान माझ्यामागे बसून होता. एकदाचा त्याला स्क्रिनिंगसाठी मशीनवर उभा केला आणि त्याचे फुप्फुस चांगल्या अवस्थेत आहे असे प्राथमिक निदान आपल्या नजरेने पाहिले तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला.

तो सगळा दिवस नुसता असल्याच कुचकामी धावपळीत गेला. पेशंटच्या पाठीत ना पाणी मिळालं, ना आम्हा कुणाला त्याचे काही पैसे मिळाले. पेशंटचा आजारही जसाच्या तसाच ठेवून आम्ही सुखाने आपापल्या घरी परतलो. माझं नशीब एवढंच की परतीचा प्रवास आमच्या पेशंटने बसने केला. स्वतःच्या खर्चाने केला. माझ्या फुकट धावपळीने तो बहुधा इतका खूष झाला की त्याने मला त्या खर्चाची तोशीस दिली नाही!

मला अजून नक्की कळत नाही. राघवच्या दवाखान्यात हे जे काही झालं त्यात काही चूक होती का आणि ती कुणाची? कमी सोयींमध्ये हॉस्पिटल चालवणाऱ्या, कमी खर्चात सेवा देऊ बघणाऱ्या, पण व्यवहाराने काहीशा कोडग्या झालेल्या राघवची की विविध कारणांमुळे नको ते धाडस करायला बळी पडणाऱ्या आणि नंतर उगाचच घाबरणाऱ्या माझी? खरं तर राघवसारखं बिनधास्त वागूनही काही वेगळं घडलं नसतं, आणि बिनधास्त वागण्याला छेद देत त्याचा प्रतिवाद करण्याचं बळ माझ्यात असतं तरी हे रामायण पुढे घडलं नसतं.

पण जे काही घडलं त्यातून आम्ही बरंच काही शिकलो, एवढं मात्र खरं!

डॉ. संजीव मंगरूळकर

दूरभाष: ९४०५०१८८२०

Leave a Reply

Discover more from The Healing Sitar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading